महाबळेश्वरची जीवनवाहिनी ‘वेण्णा लेक’ ओसंडून वाहिली! नगरपालिकेच्या वतीने वेण्णा माईची खणा-नारळाने भरली ओटी
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर आणि पाचगणी शहराची भाग्यलक्ष्मी आणि जीवनवाहिनी असलेला प्रसिद्ध वेण्णा तलाव गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने परंपरेनुसार वेण्णा माईचे उत्साहात जलपूजन करून खणा-नारळाने ओटी भरण्यात आली.
दरवर्षी पावसाळ्यात वेण्णा लेक पूर्ण भरल्यानंतर नदीची खणा-नारळाने ओटी भरण्याची पालिकेची जुनी परंपरा आहे. याच परंपरेचे पालन करत सोमवारी हा शासकीय जलपूजनाचा सोहळा पार पडला.
पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती
नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते वेण्णा माईचे विधीवत जलपूजन आणि संवर्धनाची प्रार्थना करण्यात आली. या मंगलप्रसंगी महाबळेश्वर नगरपालिकेचे अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका विमलताई पार्टे, संगिता वाडकर, स्मिता पाटील, विद्या बावळेकर, संतोष (आबा) शिंदे, रवींद्र कुंभारदरे, अफजल भाई सुतार, संजय जंगम, आणि रोहित ढेबे.
प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी: मुख्य लिपिक बबन जाधव, बोट क्लब अधीक्षक कल्याण हिवरे, अभियंता मुरलीधर धायगुडे, प्रदीपकुमार बोरगे, सुनील भालेराव, वैभव पांढरे, किरण ढेबे, अरुण बावळेकर, अख्तर बढाणे, टिके शारवान, विठ्ठल काळे, सुरेश बिरामणे आणि चंद्रकांत पाडळे आदी उपस्थित होते
वेण्णा नदीवर बांधण्यात आलेल्या या ऐतिहासिक तलावातूनच महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही प्रमुख पर्यटन शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच, याच तलावावर नगरपालिका आपला प्रसिद्ध 'बोट क्लब' देखील चालवते, जो पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. तलाव पूर्ण भरल्यामुळे दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, पर्यटनालाही मोठा बूस्ट मिळणार आहे.
तलाव ओसंडून वाहू लागल्याने स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin