महाबळेश्वरमध्ये धुवाधार पाऊस; ४८ तासांत तब्बल ३६.०६३ इंच इंचांची विक्रमी नोंद
जनजीवन विस्कळीत; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच, झाडांची पडझड , नद्यांचा प्रवाह वाढला
(वेण्णा लेक परिसरात शेतामध्ये पाणी शिरले )
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (संदेश भिसे)
राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून, गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाबळेश्वरला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या ४८ तासांत तब्बल ३६.०६३ इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे वेण्णा तलाव, लिंगमळा धबधबा तसेच वेण्णा व कोयना नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना दिल्या जात असून, घाट परिसरात दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अशा घटनांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही केली जात आहे. अनेक ठिकाणी झाडे विजेच्या खांबांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून, स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
(हॉटेल सुमनराज येथे जाणारा पूल तुटल्याने अडकलेली वाहने )
दरम्यान, वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. वेण्णा नदीकाठावरील शेतांमध्ये तसेच काही घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तसेच रस्त्यालगत असलेल्या हॉटेल सुमनराजकडे जाणारा पूल तुटल्याने तेथील वाहने अडकून पडली असून, ती क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावी लागली.
(विवर गावाकडे जाणारा रस्त्याचा काही भाग खचला)
महाबळेश्वरहून तापोळा, मेढा आणि प्रतापगडकडे जाणाऱ्या मार्गांवर काही ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे तसेच रस्ते खचण्याच्या घटना घडल्या आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
(लॉडविक तात्या वरती पडलेले झाड हटवताना कर्मचारी)
सततच्या पावसामुळे कृष्णा, वेण्णा आणि कोयना नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे शिवसागर जलाशय, कण्हेर धरण तसेच वाई तालुक्यातील बलकवडी व धोम धरणांकडे पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उन्हाळ्यात कोरडे पडलेले धबधबे आणि ओढेही पुन्हा प्रवाहित झाल्याने परिसरातील निसर्गसौंदर्य खुलून दिसत आहे. दाट धुके, हिरवाईने नटलेले डोंगर आणि फेसाळणारे धबधबे यामुळे महाबळेश्वरचा निसर्ग पर्यटकांना मोहिनी घालत असला, तरी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485






Social Plugin