महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाची संततधार; महाबळेश्वरमध्ये पावसाचा 'शंभरी' पार
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे नंदनवन आणि पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणी परिसरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने या हंगामातील पावसाने गुरुवारी १०० इंचाचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. आजअखेर तालुक्यात एकूण १००.८०३ इंच पावसाची नोंद झाली आहे.
सतत होणाऱ्या या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर शहराची जीवनवाहिनी असलेला ऐतिहासिक 'वेण्णा लेक' पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. वेण्णा लेक ओव्हरफ्लो झाल्यामुळे आणि लिंगमळा परिसरात पाणी साचल्यामुळे येथील स्थानिक पूल व लगतची शेती पाण्याखाली गेली आहे. अचानक नदी-नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.
धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ
महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मुख्य पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे परिसरातील नद्या, नाले आणि ओढे ओसंडून वाहत आहेत. या संततधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणी साठ्यातही वेगाने आणि लक्षणीय वाढ होत असून, प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरडी कोसळण्याचे सत्र
सततच्या पावसामुळे महाबळेश्वर ते तापोळा या मुख्य मार्गावर वारंवार लहान-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाबळेश्वर-तापोळा मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी काळजीपूर्वक प्रवास करावा, तसेच पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी वेण्णा लेक व लिंगमळा धबधबा परिसरात जाताना सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin