महाबळेश्वर पोलिसांकडून टॅक्सी संघटना व चालकांची महत्त्वपूर्ण बैठक ; पर्यटकांच्या सुरक्षेबाबत कडक सूचना.....
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षद अ. गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दिनांक १० जुलै २०२६ रोजी, पोलीस ठाण्यात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. सकाळी ११:२५ ते दुपारी १२:२० या वेळेत झालेल्या या बैठकीत महाबळेश्वर येथील टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी, टॅक्सी चालक आणि मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या सुरू असलेला पावसाळी हंगाम आणि पर्यटनस्थळांवरील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने या बैठकीत टॅक्सी चालकांना अत्यंत कडक आणि महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मुख्य सूचना :
अधिकृत व्यवसाय व वाहतूक नियम: कोणत्याही चालकाने विना परमिट टॅक्सी चालवू नये. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कुठेही टॅक्सी पार्क करू नये.
पार्किंग व शिस्त: नगरपालिकेने ठरवून दिलेल्या संख्येनुसारच टॅक्सी थांब्यावर वाहने पार्क करावीत. कोणत्याही टॅक्सी थांब्यावर अतिरिक्त पार्किंग चालणार नाही. तसेच, सर्वांनी ठरवून दिलेल्या नंबर (रांगेप्रमाणे) नुसारच शिस्तीत व्यवसाय करावा.
ड्रेस कोडचे बंधन: सर्व टॅक्सी चालकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत ड्रेस कोडमध्येच राहणे बंधनकारक आहे.
पर्यटकांची सुरक्षा (Selfie Danger): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, टॅक्सी चालकांनी पर्यटकांना कोणत्याही धोकादायक ठिकाणी न जाण्याबाबत आणि 'सेल्फी' काढताना काळजी घेण्याबाबत सातत्याने जागरूक करावे.
सुरक्षा व सतर्कता: टॅक्सी व्यवसाय करताना परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळून आल्यास, त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी.
कारवाईचा इशारा :
पोलीस प्रशासनाने दिलेल्या या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी समज पोनि हर्षद गालिंदे यांनी या बैठकीत दिली. यावेळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष ईस्माइल (दादा ) मानकर, उपाध्यक्ष नंदकुमार वायदंडे, अर्बन बँकेचे अध्यक्ष सी डी बावळेकर, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नदीम शारवान , राजेंद्र बावळेकर,योगेश बावळेकर, जमीर सुतार, सुभाष फळणे, प्रमोद पवार,हरिष दळवी, अंकुश ढेबे तसेच गोपनिय विभागाचे वैभव भिलारे व टॅक्सी व्यवसायिक व इतर उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin