Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील फळणे वस्तीजवळील खचलेला रस्ता अवघ्या चार दिवसांत पूर्ववत

 महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील फळणे वस्तीजवळील खचलेला रस्ता अवघ्या चार दिवसांत पूर्ववत


युद्धपातळीवर दुरुस्ती; तापोळा खोऱ्यातील १०५ गावांचा संपर्क पुन्हा सुरू, नागरिक व पर्यटकांना मोठा दिलासा


महाबळेश्वर टाईम्स



महाबळेश्वर आणि तापोळा या प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या तसेच तापोळा खोऱ्यातील १०५ गावांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील फळणे वस्तीजवळ मुसळधार पावसामुळे खचलेला रस्ता अवघ्या चार दिवसांत युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात आला आहे. नगरपरिषद प्रशासन, महसूल विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून रात्रंदिवस सुरू असलेल्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे रस्त्याखालील माती व भराव वाहून गेल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला होता. त्यामुळे एसटी बस, दूध व भाजीपाल्याची वाहतूक तसेच दैनंदिन प्रवास पूर्णपणे विस्कळीत झाला होता. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ वाहतूक बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले.


या कामासाठी सुमारे ५० ब्रास दगड, २० ब्रास खडी आणि २० ब्रास मुरूम वापरण्यात आला. पोकलेन, जेसीबी आणि टिपरच्या सहाय्याने नगर अभियंता मुरलीधर धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २० कर्मचाऱ्यांचे पथक सलग चार दिवस कार्यरत होते. दगड व मुरूमाचा मजबूत भराव टाकून त्यावर खडी दाबण्यात आली आणि रस्ता सुरक्षित व वाहतुकीयोग्य करण्यात आला.


मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, "रस्ता खचल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेने तात्काळ यंत्रसामग्रीसह काम सुरू केले. चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला. नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांची सुरक्षितता हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे."


स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक करत सांगितले की, "रस्ता बंद झाल्याने दूध, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अवघ्या चार दिवसांत रस्ता पूर्ववत झाल्याने परिसराला मोठा दिलासा मिळाला आहे."


राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी नगराध्यक्ष सुनील शिंदे व मुख्याधिकारी योगेश पाटील यांना रस्ता तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला अधिक वेग देण्यात आला.


कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, नगरसेवक अफझल सुतार, संतोष शिंदे, संजय जंगम, रोहित ढेबे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ तसेच पंचायत समिती उपसभापती संजय मोरे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.


नगर अभियंता मुरलीधर धायगुडे, बांधकाम मुकादम संदीप पवार, सुनील केळगणे, मारुती साळुंखे आणि नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे काम यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या या कार्याचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.


दरम्यान, रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी पावसाळ्यात डोंगराळ भागातून प्रवास करताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वळणांवर विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.