पुण्यातील फॅशन शोमध्ये आकल्पेच्या सुकन्येचा मानाचा मुकुट; महाबळेश्वर तालुक्याचा गौरव
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर | प्रतिनिधी
पुण्यात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 'पुणे बेस्ट ब्युटी क्वीन' या प्रतिष्ठित फॅशन शोमध्ये महाराष्ट्रासह राज्याबाहेरील अनेक युवती व महिला उत्साहाने सहभागी होतात. यंदाच्या 2026 च्या स्पर्धेत महाबळेश्वर तालुक्यातील आकल्पे गावची कु. श्रीकृष्ण जाधव यांची कन्या हिने आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब आपल्या नावावर केला.
या उल्लेखनीय यशामुळे महाबळेश्वर तालुका, सातारा जिल्हा आणि आकल्पे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या स्पर्धेतील तिच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे आणि अभिनयक्षमतेमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी तिला सिनेसृष्टीत काम करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याची चर्चा आहे. भविष्यात ती मॉडेलिंगबरोबरच अभिनय क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आकल्पे गावातील या गुणी सुकन्येच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. तिच्या या यशाने ग्रामीण भागातील अनेक मुलींना मोठी प्रेरणा मिळाली आहे.



Social Plugin