Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

वाई नगरपरिषदेच्या धर्तीवर महाबळेश्वर नगरपालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण करा

 वाई नगरपरिषदेच्या धर्तीवर महाबळेश्वर नगरपालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण करा.....


सुशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज; सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते सूर्यकांत पांचाळ यांची मागणी.....



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा मुख्य पाया मानल्या जातात. लोकशाहीची संकल्पना खऱ्या अर्थाने रुजवण्यासाठी प्रशासकीय कारभारात पारदर्शकता असणे अत्यंत अनिवार्य आहे. याच अनुषंगाने वाई नगरपरिषदेच्या धर्तीवर महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या सर्वसाधारण आणि विशेष सभांचे युट्यूब किंवा इतर सोशल मीडियाद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी ठाम मागणी सामाजिक व पर्यावरण बचाव कार्यकर्ते सूर्यकांत (बाळासो) पांचाळ यांनी केली आहे.


देशाची लोकसभा आणि राज्याची विधानसभा यांचे कामकाज थेट प्रक्षेपित केले जाते, त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज होणे आवश्यक आहे. यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जनतेला थेट उत्तरदायी राहतील. महाबळेश्वरच्या विकास आराखड्यांपासून ते पर्यावरणीय निर्णयांपर्यंत अनेक महत्त्वाचे विषय नगरपालिकेत चर्चिले जातात. थेट प्रक्षेपणामुळे नागरिकांना आपल्या परिसराच्या विकासाबाबत नेमके काय धोरण ठरत आहे, याची घरबसल्या अचूक माहिती मिळेल. तसेच स्थानिक पातळीवर कामांबाबत होणारे गैरसमज आणि अफवा दूर होऊन जनतेसमोर वस्तुस्थिती येईल.


        आजच्या काळात इंटरनेट आणि सोशल मीडिया हे माहिती पोहोचवण्याचे सर्वात सशक्त माध्यम आहे. वाई नगरपरिषदेने यूट्यूबद्वारे सभांचे थेट प्रक्षेपण करून पारदर्शक कारभाराचा एक आदर्श घालून दिला आहे. महाबळेश्वर हे जागतिक पर्यटन स्थळ असल्याने येथील प्रशासनाने कॅमेरा सेटअप व इंटरनेटची उपलब्धता करून या मॉडेलचा तातडीने स्वीकार करावा. इतकेच नव्हे तर, राज्यातील सर्व नगरपालिका,नगर पंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी सभांचे थेट प्रक्षेपण अनिवार्य करण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने जाहीर करावे, असेही त्यांनी नमूद केले.


       "पर्यावरण निसर्ग टिकवा, पर्यटन वाचवा" हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या महाबळेश्वरला प्रशासकीय प्रगल्भतेची जोड मिळणे गरजेचे आहे. लोकशाहीत जनतेला आपल्या प्रतिनिधींच्या कामकाजाचा हिशोब पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार केवळ मतदानापुरता मर्यादित न राहता दैनंदिन कामकाजाच्या निरीक्षणापर्यंत असावा त्यामुळे महाबळेश्वर नगरपालिकेने तातडीने या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन आगामी सर्व सभांचे थेट प्रक्षेपण सुरू करावे, अशी अपेक्षा सूर्यकांत पांचाळ यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

       संपादक :- राहुल शेलार 

            📱 9765576377

 कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

             📱 9403546 485