पोलादपूर-आंबेनळी-महाबळेश्वर घाट रस्ता १६ ऑगस्टपर्यंत सर्व वाहतुकीसाठी बंद; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
पोलादपूर ते महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटातील (राज्य महामार्ग १३९) प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता, हा रस्ता १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी जारी केले आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून, आंबेनळी घाटातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता दरडी कोसळणे अथवा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी हा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे.
या मार्गावर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून दरड हटवणे, ड्रेनेजची देखभाल, रिटेनिंग वॉलची दुरुस्ती आणि इतर सुरक्षेची कामे सातत्याने केली जात आहेत. मात्र, निसर्गाचा कोप आणि सततच्या पावसामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलादपूरच्या तहसीलदारांनी हा रस्ता मुदत वाढवून बंद ठेवण्याची विनंती केली होती. या शिफारसीची तात्काळ दखल घेत जिल्हा प्रशासनाने १६ ऑगस्टपर्यंत या घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin