महाबळेश्वरमध्ये गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट चालणार नाही; ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाईचा पोलिसांचा इशारा
महाराष्ट्र न्यूज : राहुल शेलार
महाबळेश्वर(सातारा)
महाबळेश्वरमध्ये गणेशोत्सव शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अत्यंत शांततेत व शिस्तीत साजरा करावा. महाबळेश्वर शहर आणि तालुका परिसरात डीजेचा दणदणाट कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा काटेकोरपणे पाळणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी दिला आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आयोजित गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरील आढावा बैठकीत ते बोलत होते. साळुंखे यांनी स्पष्ट केले की, सर्व मंडळांना पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी मंडळांनी घ्यावी. तसेच उत्सवात धांगडधिंगा घालणारे टवाळखोर, मद्यपी व उपद्रवी पोलिसांच्या रडारवर असून अशा लोकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनीही उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मंडळांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी विविध विभागांशी समन्वय साधून भाविकांची सोय करण्याचे आश्वासन दिले. विसर्जन मार्गावरील खड्डे त्वरित बुजवले जातील आणि योग्य विद्युत व्यवस्था पुरवली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, महावितरण व बांधकाम विभागाचे अधिकारी, विविध पोलीस पाटील तसेच राहुल पिसाळ, राजाभाऊ गुजर, अशोक फळणे, आकाश साळुंखे, राजेंद्र पवार, शंकर ढेबे, ऋषिकेश वायदंडे, अशोकमामा शिंदे, संदीप कोंढाळकर, गौरव राक्षे, सुशांत पार्टे, सुमित क्षीरसागर, गौरव वायकर, विजय पार्टे,ओंकार पवार, अजय आखाडे यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin