महाबळेश्वर येथे पैगंबर जयंती उत्साहात साजरी
महाबळेश्वर टाईम्सपोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी दिला तरुणांना व्यसनमुक्ती व सर्वधर्म समभावाचा संदेश
मिनारा मस्जिद च्या वतीने महाबळेश्वर येथे पैगंबर जयंती उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, मुस्लिम समाजातील नागरिक, युवक व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तौफिक पटवेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्याचा तसेच त्यांच्या शिकवणीचा परिचय उपस्थितांना करून दिला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस हवालदार फरांदे, सिनगारे, अमजद भाई पटेल व पत्रकार बांधव यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांना शवविच्छेदनाच्या (पोस्टमार्टम) कार्यात मदत करणारे निवृत्त नगरपालिका कर्मचारी हाशमभाई वारुणकर यांचा पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे म्हणाले की, पाच वेळची नमाज अदा करणे हा केवळ धार्मिक विधी नसून मन व शरीराला शिस्त लावणारी प्रक्रिया आहे. विशेषतः तरुणांनी सकाळी लवकर उठून फजरची नमाज अदा केल्यास दिवसाची सुरुवात प्रसन्न वातावरणात होऊन मन व शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून चांगल्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
धार्मिक शिस्त, परस्पर आदर आणि नमाज पठणाची परंपरा असलेल्या कुटुंबांमध्ये अनेकदा वाद-विवाद कमी असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना गालिंदे यांनी पंढरपूर येथे आपले बालपण गेले असून, त्या काळात मुस्लिम समाजातील नागरिकांमध्ये वावरण्याची संधी मिळाल्याचे नमूद केले.
इस्लाम धर्मातील तत्त्वांनुसार जीवन जगणाऱ्या आणि पाच वेळा नमाज अदा करणाऱ्या नागरिकांच्या शिस्तबद्ध जीवनपद्धतीचे त्यांनी कौतुक केले. समाजात शांतता, सलोखा आणि बंधुभाव कायम राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या धर्मातील चांगल्या शिकवणीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून राज्यगीताच्या गजरात मिरवणुकीची सुरुवात मिनारा मस्जिद येथून करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तौफिक पटवेकर यांच्यासह मिनारा मस्जिद ट्रस्टी समीर भाई शेख, अलीअजगर पिंजारी,आसिफ शेख इरफान (हिरो) शेख, समीर सरदार शेख ,शब्बीर पटेल, परवेज शेख, सईद पटवेकर, अन्सार शेख, मलिक शेख, नोबीन खान ,सरफराज शेख, इरफान मौलाना , आबिद अली व बांगी साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले.



Social Plugin