Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

पाचगणी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न; ग्राहक चळवळ अधिक सक्षम करण्याचा संकल्प

 पाचगणी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न; ग्राहक चळवळ अधिक सक्षम करण्याचा संकल्प



महाबळेश्वर टाईम्स 

पाचगणी (प्रतिनिधी):

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सातारा जिल्ह्याच्या वतीने आयोजित एकदिवसीय अभ्यासवर्ग हॉटेल बासुरी, पाचगणी येथे अत्यंत उत्साहात पार पडला. ग्राहक चळवळ अधिक सक्षम, व्यापक आणि संघटित करण्याच्या मुख्य उद्देशाने आयोजित केलेल्या या अभ्यासवर्गाला सातारा जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद तसेच ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सौ. शुभदा नागपूरकर यांनी प्रास्ताविकातून अभ्यासवर्गाची भूमिका स्पष्ट केली, तर श्री. सतीश जेबले व सौ. पूजा अंबिके यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

​दिवसभरात चार महत्त्वाच्या सत्रांमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या सत्रात राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. धनंजय गायकवाड यांनी संघटनेतील कार्यकर्त्याची भूमिका आणि विचारांची दिशा यावर सविस्तर प्रकाश टाकला. पर्यावरण संवर्धन सत्रात श्री. सोहम कुलकर्णी यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळणे, वृक्षारोपण, पाणी बचत आणि RO मधील वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर बोलताना श्री. प्रशांत पुजारी यांनी वीज बिल कमी करण्याचे उपाय सांगत वीज वितरण कंपनीबाबत कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच डॉ. अभय देशपांडे यांनी कुटुंब संवाद, सोशल मीडियाचा अतिवापर टाळणे आणि ‘राष्ट्र सर्वतोपरी’ या विषयावर पंच परिवर्तनाचा संदेश दिला. कायदेविषयक सत्रात ॲड. तुषार झेंडे पाटील यांनी २०१९ च्या नवीन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवरून तक्रार दाखल करण्याची सोपी प्रक्रिया समजावून सांगितली.

​यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. विलास लेले, प्रांत सचिव श्री. अनिल देशमुख आणि केंद्रीय संघटक मंत्री श्री. नितीन काकडे यांनी ग्राहक चळवळ गावागावात आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदस्य नोंदणी मोहीम तीव्र करण्याचे आवाहन केले.

​हा अभ्यासवर्ग यशस्वी करण्यासाठी प्रांत सदस्य श्री. केदार नाईक, सौ. शुभदा नागपूरकर, सौ. उर्मिला येळगावकर, जिल्हाध्यक्ष श्री. प्रल्हाद कदम, श्री. अरुण कट्टे, जिल्हा सचिव श्री. किशोर फुले, श्री. बाळासाहेब कोलार, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. आप्पासाहेब पिसाळ, वाई तालुकाध्यक्ष श्री. राहुलजी जायगुडे, उपाध्यक्ष श्री. अनिल भोज, सचिव सौ. रत्नमाला जाधव, सौ. निलोफर अतनूर, सौ. माधुरी काळे आणि सौ. पूजा अंबिके यांनी विशेष परिश्रम घेतले.

​अभ्यासवर्गाच्या शेवटी सर्व सहभागी कार्यकर्त्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. जिल्हा सचिव श्री. किशोर फुले यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि पसायदानाने या यशस्वी कार्यक्रमाची सांगता झाली.

        बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                संपादक :- राहुल शेलार 

                   📱 9765576377

        कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                   📱 9403546 485