स्वातंत्र्यदिन आणि वीकेंडच्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर-पांचगणीत पर्यटकांची प्रचंड गर्दी; दाट धुके, पावसाच्या सरी आणि धबधब्यांमुळे निसर्गसौंदर्याला उधाण
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर ( प्रतिनिधी)
स्वातंत्र्यदिन, शनिवार आणि रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांचे माहेरघर असलेल्या महाबळेश्वर आणि पांचगणी या निसर्गरम्य पर्यटन स्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. सध्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून वातावरणात मोठा गारठा निर्माण झाला आहे. हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वरचे रूप पूर्णपणे पालटून गेले असून, डोंगररांगांमधून कोसळणारे उंचावरील धबधबे आणि दाट धुक्याची चादर यामुळे पर्यटकांना निसर्गाचे मनमोहक दृश्य अनुभवायला मिळत आहे. ठिकठिकाणी पर्यटकांचा पावसात भिजण्याचा उत्साह दिसून येत आहे.
पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेला प्रसिद्ध वेण्णा लेक परिसर दाट धुक्यात हरवून गेला आहे. संततधार पाऊस आणि धुक्याच्या वेढ्यात पर्यटक फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. वेण्णा तलावात नौकाविहारासाठी (बोटिंग) पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून घोडेस्वारीचा आनंदही घेतला जात आहे.
(लिंगमळा मिनी डॅम येथे पर्यटकांची गर्दी )
महाबळेश्वरमधील सर्वात उंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंगमळा धबधब्यावर तर पर्यटकांची मोठी पर्वणीच ठरत आहे. लिंगमळा धबधब्याचे रौद्र आणि नयनरम्य रूप पाहण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी झाली आहे. याशिवाय प्रतापगडाकडे जाताना आंबेनळी घाटात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या लहान-मोठ्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठीही पर्यटक मोठ्या संख्येने थांबताना दिसत आहेत. संध्याकाळच्या वेळी मुख्य बाजारपेठेत गरम चणे, स्ट्रॉबेरी जाम, चिक्की, कोल्हापुरी चप्पल, स्वेटर, मफलर आणि शो-पीसच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पर्यटकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे पर्यटक हैराण
एकीकडे निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना दुसरीकडे मात्र पर्यटकांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक अत्यंत मंद गतीने सुरू आहे. या मुख्य रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे महाबळेश्वर-पांचगणी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रशासनाने या वाहतूक कोंडीवर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485




Social Plugin