Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

रोटरी क्लब महाबळेश्वरतर्फे मुलींच्या शाळेत राखी निर्मिती कार्यशाळा उत्साहात; सामाजिक ऐक्याचा दिला अनोखा संदेश

 रोटरी क्लब महाबळेश्वरतर्फे मुलींच्या शाळेत राखी निर्मिती कार्यशाळा उत्साहात; सामाजिक ऐक्याचा दिला अनोखा संदेश



महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर प्रतिनिधी-

येथील रोटरी क्लब महाबळेश्वरचे नूतन अध्यक्ष श्री. महेश कोमटी यांच्या संकल्पनेतून आणि ‘वनस्थली प्रशिक्षण संस्था’ यांच्या सहकार्याने नगर पालिका मुलींची शाळा क्र. २, महाबळेश्वर येथे विविधरंगी राखी निर्मिती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थिनींना राखी बनवण्याचे संपूर्ण साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते.

​शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिनींनी शिक्षिका व वनस्थलीच्या मार्गदर्शकांच्या मदतीने आपल्या सर्जनशीलतेचा वापर करत अतिशय सुबक आणि मनमोहक राख्या तयार केल्या. चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या राख्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. मुलींच्या या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लबतर्फे सर्वोत्कृष्ट ठरलेल्या प्रथम तीन राख्यांना शैक्षणिक साहित्याचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

​या स्पर्धेत इयत्ता ४ थी ची कु. साध्वी सतीश ढेबे हिने प्रथम, इयत्ता ५ वी ची कु. स्वरा प्रदीप ढेबे हिने द्वितीय, तर इयत्ता ३ री ची कु. स्वरा आनंदा कामुळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला रोटरी क्लबतर्फे शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली.

​या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लबसाठी शाळेच्या मुलींनी विशेष राखी तयार करून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, या पवित्र रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून न.पा. मुलींची शाळा क्र. २ च्या विद्यार्थिनींनी न.पा. मुलांची शाळा क्र. १ मधील मुस्लिम विद्यार्थ्यांना राखी बांधून शहरात सामाजिक सलोखा व ऐक्याचा अनोखा संदेश दिला.

​सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. काळे व सर्व सहशिक्षक, वनस्थली प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक सौ. सारिका ताई व त्यांच्या सहकारी, तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. महेश कोमटी, सचिव डॉ. श्री. आशिष चोपडे, श्री. दिनेश भिसे, श्री. अमित ढेबे, श्री. विजय काळे, श्री. दिनेश जाधव आणि श्री. सुनील ढेबे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष शिंदे यांनी केले.

         बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                 संपादक :- राहुल शेलार 

                    📱 9765576377

           कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                   📱 9403546 485