गिरिस्थान प्रशालेत ‘विद्यार्थीच बनले शिक्षक’; शाळेचा कारभारही सांभाळला!
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव; शिक्षक दिन उत्साहात साजरा
शिक्षक दिनाचे औचित्य साधून गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनीच शिक्षकांची भूमिका स्वीकारत अध्यापनासह शाळेचा संपूर्ण कारभार सांभाळत आगळावेगळा उपक्रम साकारला. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमध्ये जाऊन अध्यापन केले. यासोबतच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्याही विद्यार्थ्यांनी समर्थपणे पार पाडल्या.
शिक्षक होण्याचा हा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. शिक्षकांचे अध्यापन केवळ वर्गात शिकविण्यापुरते मर्यादित नसून त्यामागे असलेली जबाबदारी, शिस्त, नियोजन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी किती मोठी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून झाली.
यानंतर विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी-शिक्षकांनी मनोगते व्यक्त करून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनीही शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.
माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला मदतीचा हात
माजी विद्यार्थी आकाश झाडे यांच्या सौजन्याने वर्ग खोल्यांसाठी चार्जिंग बल्ब भेट देण्यात आले. नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी नासिरभाई मुलाणी यांनी विद्यार्थ्यांसाठी गोड खाऊची व्यवस्था केली. माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेले ऋणानुबंध जपत दिलेल्या या योगदानाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
शिक्षकांनीही घेतला मनोरंजनाचा आनंद
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत खेळांचा मनमुराद आनंद लुटला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.
नगराध्यक्षांसह नगरपरिषद पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा
गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समिती सभापती रोहित ढेबे होते. यावेळी शाळेचे माजी प्राचार्य ढाणक सर, रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरचे प्रेसिडेंट महेश कोमटी, बजरंग उतेकर, शंकर ढेबे, श्रीकांत जाधव, अंकुश शिंदे, राहुल सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्या सौ. रोहिणी बगाडे यांच्या नियोजनातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रास्ताविक प्रा. संदीप कदम यांनी केले. पारितोषिकांचे वाचन उपशिक्षक राहुल आखाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक अभिषेक साळुंखे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Social Plugin