महाबळेश्वरमध्ये नवरात्रोत्सवात सामाजिक उपक्रमांची पर्वणी!
‘एक वही, एक पेन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पारंपरिक वेशभूषा व पाककला स्पर्धांनी रंगत
Mahabaleshwar Times
महाबळेश्वर : श्री विघ्नहर्ता व्यापारी असोसिएशन मित्र मंडळ, महाबळेश्वर आणि रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव २०२६ निमित्त आयोजित पारंपरिक वेशभूषा आणि महिला पाककला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एक वही, एक पेन – कुलस्वामिनी चरणी’ या सामाजिक उपक्रमाचेही नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत बालकांनी विविध पौराणिक, ऐतिहासिक तसेच संतपरंपरेतील व्यक्तिरेखा साकारत भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविले. या स्पर्धेचे परीक्षण कलाक्षेत्रातील श्री. किसन खामकर आणि श्रीमती लीलाताई शिंदे यांनी केले.
महिला पाककला स्पर्धेत महिलांनी अवघ्या २०० रुपयांच्या मर्यादेत विविध रुचकर पदार्थ तयार करून त्यांचे आकर्षक सादरीकरण केले. या स्पर्धेचे परीक्षण शेफ सुनील आणि शेफ ब्रिजभूषण सिंह यांनी केले. दोन्ही स्पर्धांमुळे नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर पडली.
दरम्यान, ‘एक वही, एक पेन – कुलस्वामिनी चरणी’ या उपक्रमांतर्गत भाविक आणि नागरिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी वही-पेन अर्पण करीत आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लावण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता उत्साहात पार पडला. या वेळी रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरचे अध्यक्ष रो. महेश कोमटी, सचिव रो. डॉ. आशिष चोपडे आणि रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमांच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष सुमित क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रताप जाधव तसेच सभासद अभिषेक साळुंखे, अमित माळवदे, गौरव वाईकर, केतन बगाडे, मनीष साळुंखे आणि प्रणव जंगम यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच नगरसेवक संजय जंगम यांचे मंडळाला मार्गदर्शन लाभले.
नवरात्रोत्सवाच्या धार्मिक वातावरणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या या उपक्रमाचे महाबळेश्वरमध्ये कौतुक होत आहे.


Social Plugin