Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणांवर नगरपरिषदेचा हातोडा

 पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणांवर नगरपरिषदेचा हातोडा!



रस्ते व फूटपाथ पर्यटकांसाठी मोकळे; पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा

Mahabaleshwar Times 

महाबळेश्वर  : प्रतिनिधी 


महाबळेश्वर शहरातील पॅनोरमा हॉटेल परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमणे हटवून हा परिसर नागरिक आणि पर्यटकांच्या वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.


नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी योगेश पाटील, पोलिस निरीक्षक हर्षद गालिदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पॅनोरमा परिसरातील रस्ते व फूटपाथवर अतिक्रमणे झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली.


पुन्हा अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई


सार्वजनिक रस्ते आणि फूटपाथवर पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिला. शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाकडून यापुढेही मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


या कारवाईचे नेतृत्व अतिक्रमण विभागप्रमुख मुरलीधर धायगुडे यांनी केले. वरिष्ठ लिपिक बबन जाधव, कर निरीक्षक अमित माने, वैभव पांढरे, नगररचनाकार मिलिंद गायकवाड यांच्यासह कर, बांधकाम आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.


महाबळेश्वर शहराचे सौंदर्य जपणे, सार्वजनिक रस्ते व फूटपाथ नागरिकांसाठी खुले ठेवणे आणि पर्यटकांना सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने सांगितले.


       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

               संपादक :- राहुल शेलार 
                  📱 9765576377
          कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 
                 📱 9403546 485