सुरूर–पोलादपूर राज्य मार्गावरील खड्ड्यांवरून पालिका आक्रमक; एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर....!
दिवाळीपूर्वी रस्ता खड्डेमुक्त करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन; नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांचा पुढाकार...
महाबळेश्वर टाईम्स
पाचगणी : प्रतिनिधी
सुरूर–पोलादपूर राज्य मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, रस्त्यावरील ठिकठिकाणच्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता?’ असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. या गंभीर समस्येची दखल घेत पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी घाटजाई शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पालिका कार्यालयात बोलावून चांगलेच धारेवर धरले.
सुरूर–पोलादपूर हा महत्त्वाचा राज्य मार्ग सध्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) अधिपत्याखाली असून, या मार्गाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. मात्र, कामाचा संथ वेग आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पाचगणी पालिका हद्दीतही अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांना या खड्ड्यांचा मोठा फटका बसत आहे.
रस्त्याच्या कामाची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाकडे आहे, तसेच खड्ड्यांच्या समस्येबाबत कोणत्या अधिकाऱ्यांकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पालिका हद्दीतील रस्ता तातडीने खड्डेमुक्त करावा आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशी ठाम भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.
कंपनीच्या संचालकांवर प्रश्नांचा भडिमार
रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीचे संचालक अथर्व सावजी यांनाही नगरसेवक नारायण बिरामणे आणि बांधकाम सभापती राजेंद्र पारठे यांनी कामाच्या संथ गतीबाबत तसेच रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जाब विचारला. कामाचा दर्जा, खड्डे बुजविण्याची आवश्यकता आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याबाबत पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवसापासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येईल, तसेच दिवाळीपूर्वी रस्ता खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी
एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा पालिका पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला; मात्र त्यांनी फोन न उचलल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. रस्त्याच्या प्रश्नाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेद्र राजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, मुख्याधिकारी पंडित पाटील, घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेखर कासुर्डे, बांधकाम सभापती राजेंद्र पारठे, नगरसेवक नारायण बिरामणे, महेश खांडके आणि पालिकेचे अभियंता निखिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin