श्री भवानीमाता मूर्ती स्थापना ३६७ वर्षेपूर्ती: लखलखत्या मशाली आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतापगड शिवमय
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक किल्ले प्रतापगड शुक्रवारी रात्री एका अभूतपूर्व आणि नयनरम्य सोहळ्याने उजळून निघाला. श्री भवानीमातेच्या मूर्तीच्या स्थापनेला तब्बल ३६७ वर्षे पूर्ण झाल्याच्या मंगलप्रसंगी गडावर तब्बल ३६७ मशाली प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. या मशालींच्या लखलखत्या प्रकाशाने अवघा प्रतापगड परिसर तेजोमय झाला होता. ढोल-ताशांचा कडकडाट, गगनाला भिडणारा 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष, फडकणारे भगवे ध्वज आणि आकाशात झालेली नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण गड शिवमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार गडाचे तत्कालीन किल्लेदार व हवालदार पानसरे यांनी नेपाळमधील गंडकी नदीतील पवित्र शाळिग्राम शिळेपासून भवानीमातेची सुबक मूर्ती घडवून आणली आणि तिची प्रतापगडावर स्थापना केली होती. या ऐतिहासिक घटनेला ३६७ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून यंदा ३६७ मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पणाराजे आणि श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे यांच्या संकल्पनेतून २०१० सालापासून या मशाल महोत्सवाची परंपरा सुरू झाली आहे. यंदा या उत्सवाचे १७ वे वर्ष असल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. ललिता पंचमी/चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर भवानीमातेची विधिवत पूजा आणि पारंपरिक गोंधळ पार पडल्यानंतर रात्री ८ च्या सुमारास मशाल महोत्सवाला थाटात प्रारंभ झाला.
'स्वराज्य ढोल-ताशा पथका'च्या कडकडाटात आणि भगवे ध्वज फडकवत शिवभक्तांनी जल्लोष केला. यावेळी झालेल्या जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीने प्रतापगडाच्या आकाशात विविध रंगांची उधळण झाली. गडावरील भवानीमाता मंदिर परिसर तसेच गडाच्या मुख्य महाद्वाराला करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
या सोहळ्यासाठी सातारा, रायगड, रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो शिवभक्तांनी तसेच प्रतापगड आणि वाडा कुंभरोशी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. दुरून आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्यामुळे प्रतापगडाचा संपूर्ण परिसर भक्तिमय, उत्साही आणि शिवकालीन आठवणींनी भारून गेला होता.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin